Dead man's fingers
दोन - तीन दिवसांपूर्वीचा प्रसंग आहे, कन्या शाळेचे लहान वर्ग व विज्ञान प्रयोगशाळा या दोन्हींच्या मधील बोळातून स्वच्छतागृहाकडे जात होतो. अचानक कुजलेला उंदीर असावा तसा वास आला. काही पावलं पुढे गेल्यानंतर वास आणखीनच उग्र झाला. कुठेतरी वर्गात उंदीर मरून पडला असावा असे वाटले. संगणक प्रयोगशाळा व विज्ञान प्रयोगशाळांमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत पाहिले, पण तेथे काहीच नव्हते, बाजूच्या वर्गातील मुलेही आपापल्या कामात व्यस्त होती. परत येताना सहज खाली नजर गेली असता दुसरी वर्गाच्या भिंतीला लागून एक सोललेले व उभ्या चिरा पडलेले केळ दिसले. त्याचा आकार जमिनीतून आलेल्या पांढऱ्या हातासारखा आहे असा क्षणभर भास झाला. खराब झालेले केळ असावे कदाचित, असा विचार करून पुढे निघून गेलो.
आज परत त्याच अरुंद रस्त्यातून येताना कुजलेला दुर्गंधीचा वास पुन्हा आला, व काही पावले पुढे गेल्यानंतर प्रयोगशाळेच्या भिंतीजवळ तशाच प्रकारच्या केळाचा आकार पुन्हा दृष्टीस पडला. यावेळी मी त्याला खाली वाकून नीट निरखून पाहिले. त्या केळी सारख्या वस्तूच्या जमिनिकडील बाजूस फुलाला जसे देठ असते तसा पिवळा देठा सारखा भाग दिसला. जणू काही ते केळ त्या देठातूनच उगवले आहे असे दिसत होते. त्याच्या वर आलेल्या बाजूचे चार पाच उभे भाग झालेले होते, वरील बाजूस ते उभे भाग हाताच्या पाच बोटांसारखे दिसत होते. खाली वाकून पाहिल्यावर ती दुर्गंधी त्यातूनच येत असल्याचे लक्षात आले. त्याच्या खालच्या देठामुळे हे केळ नसून एक प्रकारची बुरशी आहे याचा अंदाज आला, इतके ते हुबेहूब सोललेल्या केळीसारखे दिसत होते. अशा प्रकारची बुरशी मी पहिल्यांदाच पाहिली होती. त्याचा एक फोटो घेतला व तो फोटो गूगल वर image search करून पाहिले. गूगल ने लगेच त्या बुरशी विषयी सविस्तर माहिती दिली. इंग्रजीत या बुरशीला dead man's fingers असं म्हणतात. कुजलेल्या लाकडावर वाढणारी ही विषारी बुरशी निसर्ग चक्राचा एक महत्वाचा भाग आहे. आणि पूर्ण वाढ झालेल्या या बुरशीला कुजलेल्या मांसा सारखा दुर्गंध येतो.
गुगल ने उत्तर दिले परंतु त्या नावाने सर्च मध्ये दिलेल्या इमेज मी पाहिलेल्या बुरशी सोबत जुळत नव्हते. त्यामुळे आणखी थोडी माहिती मिळवण्याचे ठरविले. फेसबुक वर वनस्पती शास्त्राच्या अभ्यासकांचा एक ग्रुप आहे. त्यावर मी काढलेला फोटो टाकला व त्यांना मार्गदर्शन विचारले. त्यात आणखी नवीन माहिती मिळाली. Dead Man's Fingers (Xyleria Species) शिवाय आणखी एक वेगळे नाव तेथील एका बुरशी तज्ज्ञांनी (Mycologist) सुचवले. त्यांनी भारतात आढळणाऱ्या बुरशीच्या आणखी एका Phallus नावाच्या प्रजातीशी मी काढलेला फोटो ची तुलना करण्यास सुचवले. या प्रकारच्या बुरशीला सुद्धा कुजलेल्या माणसाचा वास येतो. हा बुरशीचा नेमका कोणता प्रकार आहे हे नक्की साधण्यासाठी दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्याच ठिकाणी लक्षपूर्वक पाहण्यासाठी गेलो. पण तेथे ती बुरशी नव्हती. तिला येणाऱ्या विशिष्ट वासामुळे एखाद्या प्राण्याने (मांजर अथवा कुत्रा) ती इतरत्र नेली असावी. त्यामुळे ती नेमकी कोणत्या प्रजातीची बुरशी होती? हा अजूनही एक अनुत्तरित प्रश्न आहे....
निसर्गात पण किती विविधता असते ना? किती अजब प्रकारचे जीव आणि वनस्पती पाहायला मिळतात. आज Dead man's fingers या बुरशी च्या निमित्ताने निसर्गाचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.